Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावरून ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करतायत
सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच शंभुराज यांचे कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन बोलत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी डिवचले.
तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का?
तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही. तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासली. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती!, असे ट्विट करत सुषमा अंधारेंनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"