Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj:बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळातून बागेश्वर बाबावर टीका केली जात असून, त्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. यानंतर बागेश्वर बाबाने माफी मागितली असली, तरी यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.
काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानावरून सुषमा अंधारे यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. माफी मागूनही वारकरी संप्रदायातील अनेकांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. सुषमा अंधारेंविरोधात राज्यभर गुन्हे दाखल करण्याची तयारीही सुरू करण्यात आली होती. हाच धागा पकडत सुषमा अंधारे यांनी बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानावरून सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस चकार शब्द काढत नाहीत
बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानानंतर वारकरी संप्रदाय गप्प आहे. वारकरी, कीर्तनकार ही सगळी लोक आता शांत कसे, एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठांचा एवढा मोठा अपमान केला. यावर देवेंद्र फडणवीस चकार शब्द काढत नाहीत, भाजपचा नेता यावर काही बोलत नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच हाइटची गोष्ट अशी की, संबित पात्रांना महागाईबाबत विचारल्यावर ते हिंदू खतरे में हैं, एवढेच बोलतात. पण महागाईवर बोलत नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. मैं क्या बोल रहा हूँ, तुम क्या बोल रहा रहा हैं, क्या चल रहा हैं, अशी फिरकीही सुषमा अंधारे यांनी घेतली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बागेश्वर बाबाने केलेल्या विधानावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. बेताल वक्तव्यांविरोधात आता कायद्याची गरज आहे. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहिजे. २७ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडून यासंबंधी कायदा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"