Sushma Andhare Vs Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका केली. राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागून कोण बोलत आहे हे कालांतराने कळेल. जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना आवडते. त्याची कारणे वेगळी असतात. स्वत:च्या जातीबाबत अभिमान असणे हे महाराष्ट्रात होत होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची जेव्हा स्थापना झाली त्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेश निर्माण करणे हे व्हायला लागले. असे होऊ लागले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होऊ शकतो. स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्राची इमेजची वाट लावण्याचे प्रकार सुरु आहेत. माझ्या पक्षात जातीपातीला थारा मिळणार नाही, होताना दिसले तरी त्याला पक्षापासून दूर ठेवेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला.
भाजपला मदतच करायची असेल तर उघडपणे करा
आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काहीही स्टेटमेंट करावे आणि आपल्याला जेव्हा वाटते तेव्हा आपण खुशाल आराम करावा, अशा पद्धतीने जी स्टेटमेंट करणारी माणसे असतात. त्यामुळे त्यांनी त्यावर फार बोलू नये पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा अडून मदत करणे थांबवावे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामलल्ला मोफत दर्शनाबाबत केलेल्या विधानाबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गृहमंत्री काय रामलल्लाच्या वरचे झाले आहेत का? याच्या आधी काय लोकांनी रामलल्लाचे दर्शन केलेच नाही का? भारतातील लोक हे देवदर्शन स्वतःच्या पैशाने करू शकत नाहीत का? देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे जर गृहमंत्री आणि पंतप्रधान जर या देशाला लाभत असतील तर हे मोठे दुर्दैव आहे. हे इतके सर्व शक्तिमान झाले का? अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.