Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कथित भूखंड घोटाळा यांसह अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा निर्धार व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. आता माघार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
एका जाहीर सभेत बोलताना, सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हिडिओ दाखवत सदर आवाहन केले आहे. हा व्हिडिओ यासाठी दाखवला की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाचे चित्र सर्व शिवसैनिकांच्या मनात साठले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर, विधानभवनावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
एका महिन्यात १५ लोकांना क्लिनचीट देऊन क्लोजर रिपोर्ट कसा काय दिला?
मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. यांचे सामान्य लोक म्हणजे कोण? तर सुभाष देशमुख, निलंगेकर, वगैरे वगैरे… देवेंद्रजींनी एका महिन्यात १५ लोकांना क्लिनचीट देवून क्लोजर रिपोर्ट कसा काय दिला? यावर आम्ही सरकारला प्रश्न विचारणारच, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच तानाजी सावंत हा आपला भाऊ आहे. त्याला काही म्हणू नका, असे म्हणत अंधारे यांनी सावंतांना डिवचले.
दरम्यान, लोकसंख्या जास्त असली म्हणून ती विकासाला अडचण ठरत नाही. तसे असते तर चीन सर्वाधिक जास्त लोकसंख्या असुनही ती जगात पुढे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले. तर, कॅगच्या अहवालात सांगितले आहे की, एका महिन्यात १५ लाख नोकऱ्या गेल्या. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हिंदू मुस्लिम भांडण लावत आहेत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"