Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून पुणे बंद पाळण्यात आला. बंदबरोबरच मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरु झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यादेखील मोर्चात सामील झाल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली.
भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबूजून महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपला ऐकायचे नसेल तर आम्ही असे समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. आम्ही सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत. पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे, असे सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृवात सुरु
राज्यपाल या घटनात्मक पदाबाबत नितांत आदर आहे. पण, या पदावर बसलेली व्यक्ती आदर देण्यासारखी नाही. जेव्हा-जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही. आमच्या ४० चुकार भावांनी त्यांना थांबवले नाही. महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी देवेंद्रजी हिरीरीने पुढे आले. पण, महापुरुषांचा अवमान होतो तेव्हा चकार शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांना परत बोलवा, असे पत्रही महाशक्तीला पाठवत नाहीत, अशी टीकाही अंधारे यांनी केली.
दरम्यान, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोनिया गांधी यांनी माफ केले. तुमच्यावर शाई फेकणाऱ्यावर तुम्ही खुनाचे कलम लावले. दादा, तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राचा आक्रोश जनता तुम्हाला मतपेटातून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"