Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली जात आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशांवरून किरीट सोमय्या आणि भाजप नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. देशभरातील बिगर भाजप मुख्यमंत्र्यांनी आणि विविध पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. पंतप्रधानांना पत्र यासाठी लिहिले की, देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांकडे पाहिले जाते. अपेक्षित असे आहे की, त्यांनीच याचे उत्तर द्यायला हवे. जर ते उत्तर देणार नसतील, तर त्यांच्या सचिवालयातील एखाद्या अधिकाऱ्यांनी पत्राला उत्तर द्यायला हवे. पण याउलट भाजपचे प्रवक्तेच उत्तर देत आहेत, असे सांगत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.
किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RIT कार्यकर्तेच अधिक
स्वच्छता दूत आणि ज्यांच्यामुळे भाजपचे सरकार सत्तेत आले, असे किरीट सोमय्या ते राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्तेच अधिक आहेत. त्यांनी आरोपी केलेल्या लोकांमध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. त्यांच्यावर १७५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता. सरनाईक यांनी शरणागती पत्करली. आपण असे समजू सोमय्या हे चुकून बोलले असेल. पण माणूस एकदा चुकू शकतो, पण नेहमीच नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सरनाईक यांच्यावर आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या. आनंद अडसुळांसाठी त्यांनी ६ पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळींसाठी त्यांनी ८ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २२४ ट्विट केले. यशवंत जाधवांसाठी १६ पत्रकार परिषदा घेतल्या, अर्जुन खोतकरांसाठी त्यांनी ९ पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्यासाठी २४ ट्विट केले, अशी आकडेवारीच सुषमा अंधारे यांनी दिली.
दरम्यान, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय का? वारंवार भाजपविरहीत लोकांनाच नोटीस येत आहेत. जे दोन टक्के लोक आहेत, जे भाजपमध्ये असून त्यांच्यावर कारवाई झाली, ते भाजपसाठी निरुपयोगी झाले आहेत, असा दावा करत, इतर पक्षातील नेते भाजपमध्ये गेले की, ते व्हाईट होतात. त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"