Maharashtra Politics: राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच आता सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच शहाजी बापू यांचे उरलेले राजकीय वजन २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच नाशिकमधील ठाकरे गटातील सुमारे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्या सभांना शे-पाचशे लोकांची गर्दी असते, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळींनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या राज्यभरातील सभांमुळे शिंदे-मिंधे गट असेल किंवा भाजप असेल, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा थयथयाट सुरू आहे. मात्र, सुषमा अंधारे यांची सभा शंभर-पाचशे लोकांची नसून, १५ ते २० हजार लोक सभेला येतात. सुषमा अंधारे यांच्या सभेचे व्हिडिओ पाहा, शहाजी बापू तुमची झोप उडेल. शहाजी बापू पाटील आमचे मित्र आहेत, यानिमित्ताने सांगू इच्छितो की, तुम्ही शारिरीक वजन कमी केले ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य चांगले ठेवायला हवे. पण तुमचे उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा शरद कोळी यांनी दिला.
सुषमा अंधारे यांच्या सभेचा शहाजी बापूंनी धसका घेतला
सुषमा अंधारे यांची सभा झाली. तेव्हा शहाजी बापू पळून गेले. सुषमा अंधारे यांच्या सभांचा शहाजी बापू पाटील यांनी धसका घेतला. त्यामुळे यापुढे मी सांगोल्याचा आमदार नाही. मी सांगोल्याचा आमदार होऊ शकणार नाही, असे शहाजी बापूंनी सांगून टाकले. हे सुषमा अंधारे यांच्या सभेमुळे झाले. शहाजी बापू पाटील जाणून-बुजून अशी विधाने करत आहेत, अशी टीका शरद कोळी यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"