सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी प्रभाग निहाय्य शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा धडाका सुरू केला. प्रभाग निहाय्य बैठकीत किती जण पक्षाचे काम करतात. आदींची माहिती मिळून निष्क्रिय व पक्ष सोडून गेलेल्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे संकेत चौधरी यांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनासह राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षाची सत्ता असून निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राहण्यासाठी शिवसेना प्रयत्नशिल आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी गेल्या आठवड्यापासून प्रभाग निहाय्य बैठका घेणे सुरू केले. महापालिका निवडणुकीत आघाडीतील पक्षाची आघाडी होणारच, असे सांगू शकत नाही. मात्र महापालिकेत सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्यासाठी बैठकसत्र सुरू केल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. बैठकसत्राने शिवसैनिकात व पदाधिकाऱ्यात चैतन्य निर्माण झाल्याचे म्हणाले. चौधरी यांच्यासह उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व नगरसेवक बैठकीला उपस्थित राहत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षात कलानी कुटुंबाने प्रवेश घेतल्याने, राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाआघाडी झाल्यास, महापालिकेवर सत्ता निश्चित येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना व पप्पु कलानी यांच्यात संवाद उत्तम असल्याने, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी व शिवसेनेची युती अटळ होण्याची शक्यता दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. महापालिका निवडणुकीत महाआघाडीची समन्वयक म्हणून काम करण्याचे पप्पु कलानी यांनी यापूर्वीच जाहीर केले. मात्र सर्वाधिक जागा जिंकून महापौर पदावर दावा सांगण्यासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची चित्र शहरात आहे. पप्पु कलानी यांची पेरॉलवर सुटका झाली. तेंव्हा पासून कलानी यांनी शहर पिंजून काढून शहरात कलानीमय वातावरण निर्माण केले. चौकट
निष्क्रियेतांच्या पदावर टांगती तलवार? शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतलेल्या प्रभाग निहाय्य बैठकीत निष्क्रिय पदाधिकाऱ्याच्या पदावर टांगती तलवार असल्याची संकेत पक्षाने दिले. तसेच पक्ष सोडून गेलेल्याच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याची माहिती चौधरी यांनी दिली.