मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेल्या बंडामुळे सत्ता गमवावी लागल्यानंतर आता पक्ष टिकवण्याचं आव्हान ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरत शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे, त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसे संकेत दिले आहेत. अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मत मांडलं आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देणं, म्हणजे भाजपाला पाठिंबा दिला, असं होत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत खासदारांचा कल जाणून घेतला. महाराष्ट्रातही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत. काल झालेल्या बैठकीला आमशा पाडवी, निर्मला गावित उपस्थित होते. यासंदर्भात अंतिम निर्णय काय घ्यायचा तो उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असे निश्चित झाले आहे, असे राऊत यांनी सांगितले.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे भाजपाला पाठिंबा दिला असं होत नाही. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत, त्यांनाही आमच्या सदभावना आहेत. देशात विरोधी पक्ष एकजूट मजबूत असला पाहिजे. मात्र अशा निवडणुकांसंदर्भात लोकभावना काय आहेत, याचा विचारही झाला पाहिजे. याआधीही आम्ही मराठी व्यक्तीच्या मुद्द्यावर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर प्रणव मुखर्जी यांनाही आम्ही एनडीएत असताना पाठिंबा दिला होता, य़ाची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भूमिका स्पष्ट करतील. त्यांना आज किंवा उद्या भूमिका स्पष्ट करावीच लागेल. पक्षप्रमुख हे कुणाच्या दबावाखाली काम करत नाहीत. सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर आता तुम्ही निर्णय घ्या असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. हा निर्णय सर्व आमदारांना बंधनकारक राहिल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. आपण याविषयी एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खासदारांना बैठकीत सांगितले.
मुर्मू यांना पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या खासदारांमधील फूटही उद्धव ठाकरे यांना टाळता येईल. त्यामुळे लोकसभेतील पक्ष एकसंध राहावा म्हणूनही ते मुर्मू यांना पाठिंबा देतील, असे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या ११ खासदारांनी अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि हे खासदार लोकसभेत वेगळा गट स्थापन करणार असल्याचीही चर्चा आहे.