समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 14:46 IST2024-10-27T14:45:53+5:302024-10-27T14:46:55+5:30
समाजवादी पक्षाने उमेदवार ठरवलेल्या पाच जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी
Samajwadi Party : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्वच पक्षांमध्ये जागा आणि उमेदवारांबाबत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीसोबत असलेल्या समाजवादी पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने महाराष्ट्रात समाजवादी पक्षाला सपशेल बाजूला केलं आहे.
जागावाटपाच्या बाबतीत, समाजवादी पक्षाने पाच जागांची मागणी केली होती. मात्र समाजवादीने दावा केलेल्या तीन जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करुन टाकली आहे. तीन जागांवर शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रात पाच जागा देण्याची मागणी केली होती. मात्र अबू आझमी यांनी मागितलेल्या पाचपैकी तीन जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने २६ ऑक्टोबर रोजी त्यांचे उमेदवार जाहीर केले. अबू आझमी यांनी धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य जागा मागितल्या होत्या.
रईस शेख हे भिवंडी पूर्वेतील सपाचे आमदार आहेत. मात्र शनिवारी शिवसेनेने धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली. तर मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आपल्याच जागेवर अबू आझमींच्या अडचणी वाढल्या आहेत.
यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्याविरोधात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर केली नसली तरी मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर लढण्याचा निर्धार केला आहे.
तीन जागांवर मित्रपक्षांनी समाजवादी पक्षाला बाजूला करत उमेदवारी जाहीर केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने खेळलेल्या या खेळीमुळे अबू आझमी देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत. समाजवादी पक्षाने या जागांवर आपले उमेदवार आधीच जाहीर केले होते पण ठाकरे गट आणि काँग्रेसने जागावाटपात सपाला बाजूला केले. आता अबू आझमी यांनी पाच जागा न मिळाल्यास सर्व २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे.