मुंबई - विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांची उमेदवारी मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला; मात्र त्यांनी तो उचलला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तर या विधान परिषद जागांवर उद्धवसेनेची कामगिरी चांगली असल्यानेच या चारही जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची भूमिका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे.
पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते की विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो. दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारले की तुमचे उमेदवार कोण आहेत? त्यानंतर मी त्यांना उमेदवारांची नावे सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केले, असे म्हणत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणे आम्हाला सोपे झाले असते. मात्र, त्यांनी चारही जागा परस्पर घोषित केल्या, असेही ते म्हणाले.
दोन्ही पक्ष आमनेसामनेउद्धवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांना तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांना उद्धवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना तर नाशिक शिक्षक मतदारसंघात दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.