Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेतील गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांनंतर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते शिंदे गटात गेले आहेत. राज्यभरात शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे. यात आणखी एका जिल्ह्यात शिवसेनेतील पदाधिकारी शिंदे गटात गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या पाथर्डी आणि इंदिरानगर परिसरात उद्धव ठाकरे यांचे कट्टर समजले जाणारे सेनेचे माजी पदाधिकारी वसंत पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेले वसंत पाटील यांची नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. वसंत पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे पदाधिकारी होते. याशिवाय डेमसे यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे.
शिंदे गटाची ताकद वाढतेय
नाशिकमधील आमदार-खासदार यांच्यानंतर आता स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याने आता शिंदे गटाची संघटनात्मक पातळीवर ताकद वाढत आहे. शिवसेनेला गळती लागली असताना नाशिकमधून मात्र ठाकरेंना सोडून कोणताही मोठा पदाधिकारी शिंदे गटात गेलेला नव्हता. अशात आता ठाकरे गटातील माजी नगरसेवकांच्या जवळचा व्यक्तीने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून माजी नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चा आहेत.
दरम्यान, केवळ शिवसेना नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"