सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्ये आपल्या पातळीवरही कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा आणि नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. याशिवाय सर्वाधिक रुग्णसंख्याही महारातूनच समोर येत होती. परंतु आता राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण असा पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता. प्रभू चावला यांनी घेतलेल्या पोलनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे असा कल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. शिवसेना समर्थकांकडून या पोलचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल करण्यात येत आहे.
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं? असा प्रश्न प्रभु चावला यांनी ट्विटरच्या पोलद्वारे विचारला होता. त्यांनी दोन पोलद्वारे आठ मुख्यमंत्र्यांची नावं निवडली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केरचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि कर्नाटकचे बी.ए. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश होता.