Uddhav Thackeray Aurangabad Visit: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेण या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
माझी भेट ही प्रतिकात्मक आहे
शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसते परंतु ही अस्मानी संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. त्याचे घरदार उघड्यावर पडता कामा नये. माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळे निघालेले आहे. दिवळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचे? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकरी राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचे दिवाळे निघाले असते
मी का मुद्दाम आलो. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून आलेलो नाही. तर या शेतकऱ्यांचे ऋण आपल्यावर आहे. महाविकास आघाडीच्या काळात साधरण दोन-अडीच वर्ष कोरोनात गेली. सर्वत्र लॉकडाउन असताना, आपल्या अर्थव्यवस्थेला जर कोणी आधार दिला असेल तर आपल्या अन्नदात्याने दिला आहे. कृषी क्षेत्राने दिला आहे कारण तिथे लॉकडाउन करता येणे शक्य नव्हते. शेतकरी राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचे सुद्धा दिवाळे निघाले असते, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तसेच ५० हजार प्रति हेक्टर ही शेतकर्यांची मागणी आहे.पंचनामे कधी करणार? तोपर्यंत शेतकर्यांचे आयुष्य बरबाद होईल. पंचनामे होतील तेंव्हा होतील. ओला दुष्काळ जाहीर करा, कारण भावनांचा दुष्काळ आहे. मदत तत्काळ करा ही शिवसेनेची मागणी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"