मुंबई - आजही ४० लोक तुम्हाला फिरताना दिसतायेत ते जिवंत प्रेतं आहेत. हे विधान मी आजही बोलतो. केंद्रीय तपास यंत्रणांचे खटले सुरू होते आणि अनेकांना पैसे मिळाले त्यामुळे आमदार, खासदार शिंदे गटात गेले. खोके आहेत त्याशिवाय कसे जातील? खोके घेतले असे काही आमदार म्हणालेही. आमदारांची प्रवृत्ती आणि विकृती काय हे आम्हाला माहिती आहे. खोके आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव या युतीतून ते बाहेर पडले असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी दिलेली धमकी नव्हती तर सत्य होते. हे स्वत:ला फार बेडर समजत होते मग आमच्या धमकीला घाबरून पळाला का? आमच्या नजरेला नजर देऊन पक्ष सोडायला हवा होता. रात्रीच्या अंधारात सूरतला जाता. तिथे अँडव्हान्स घेतात त्यानंतर गुवाहाटीला जाऊन जादूटोणा करतात. हे विधी जे करून आलेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. माझ्या विधानाची कॅसेट असो वा व्हिडिओ आहे जे आहे ते बोललो. मी बोललो म्हणून पळून गेले नाहीत. तुम्ही जिवंत शरीर नाही तर तुमचा आत्मा मेलाय हे स्पष्ट बोललो मी असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच जोपर्यंत निवडणूक आयोग अन्याय करत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला हवा. घटनेने देशात अनेक स्वायत्त संस्था निर्माण केल्यात त्याला धक्का लागता नाही असं वाटतं. आम्ही आमची बाजू पुराव्यासह मांडली आहे. १० व्या शेड्युल्डनुसार पक्षाच्या आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले हा सरळ सरळ अपात्रतेचा मुद्दा आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. निकाल लागल्यावर आम्ही आमचे मत मांडू. विश्वास ठेवायला लागेल. हे आमदार अपात्र ठरायला हवेत. पक्ष फुटलेला आहे आणि ते फुटून गेलेत त्यामुळे ते पक्ष सोबत घेऊन जात शकत नाही. पक्षाच्या चिन्हावर हे निवडून आलेत. निवडणूक आयोगासमोर आम्ही बाजू मांडली. सर्वाधिकार प्रतिनिधी सभेने पक्षप्रमुखाला दिलेत. मुख्य नेता हे पद घटनेत नाही असं राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आमची बाजू न्यायाची आणि सत्याची आहे. शिवसेनेला ५५ वर्षाचा इतिहास आहेत. याआधीही अनेक लोक पक्षातून गेले. यावेळचा आकडा जास्त असला तरी तो फुटीर गट आहे. उद्या कुणीही फुटीर पक्षातून जातील आणि हा आमचा पक्ष आहे बोलतील असं होत नाही. मूळ पक्ष जागेवरच असतो. तुमचा गट वेगळा करा आणि त्यातून निवडणूक लढवून दाखवा. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हवेत, चिन्ह हवे मग स्वत:चं काय? लिहून दिलेली भाषणे वाचतायेत. दिल्लीत हायकमांड आणि राज्यातलं हायकमांड सागर बंगल्यावर आहे असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.