Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यापूर्वी सावित्रीबाई फुले आणि अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ते अडचणीत सापडले. त्यांना अनेक स्तरातून रोषाला सामोरं जावं लागलं. यातच आता स्वतः कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच!” अशी प्रतिक्रिया यावर राऊत यांनी दिली.
अनेकदा वक्तव्यांमुळे चर्चेतयापूर्वी सावित्रीबाई फुले, गुजराती मारवाडी समाज आणि मुंबई बद्दल केलेलं वक्तव्य आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कोश्यारींना सर्वांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अनेक स्तरातून त्यांचा तीव्र विरोधही करण्यात आला. तसंच त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही राजकीय स्तरातून करण्यात आली.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात येत आहे. त्यांना आपल्या गृहराज्यात जाऊन पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या वृत्तांना राज्यपालांकडून दुजोरा आलेला नाही.