राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्यासंदर्भात घोषणा केली. यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी, त्यांनी काँग्रेसचे उदारहण देताना, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, पण निर्णय राहुल गांधीच घेतात, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचऱ्या शब्दात सुनावत ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी, अशी टीका केली. यानंतर संजय राऊतांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला.
“त्यांच्या पक्षाविषयी कोणीच काही बोलत नाहीये. त्यांच्या पक्षाविषयी शरद पवारांनी पुस्तकात भूमिका मांडली आहे. त्यांनी त्यावर बोलायला पाहिजे. भविष्यात चाटुगिरी कोण करतं हे येणारा काळ ठरवेल. शिवसेनेनं कधीही अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही. आपण महाविकास आघाडीत आहात. आपण आपल्या तोंडावर बंधनं घाला,” असा सल्ला राऊतांनी त्यांना दिला. तुमच्याविषयी जर आम्ही बोलायला लागलो तर चोंबडे कोण चाटू कोण याचा खुलासा होईल. याविषयी आपल्याला बोलायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
“त्या दिवशीही व्यासपीठावर भेटले चांगलं बोलले. काँग्रेसविषयी कोणतंही विधान आम्ही केलेलं नाही. ते कोणाचं ऐकून बोलतायत किंवा त्यांच्याकडे कोणाचा रेडियो आहे हे माहित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाबात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्याबद्दल कोणीही बोलून नये, महाराष्ट्र कायम राहिल पक्ष निघून जातील,” असंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले होते पटोले?
"मल्लिकार्जून खर्गे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणं आणि गांधी कुटुंबावर चुकीचा आरोप करणं, ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. हे चुकीचं होईल. अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्याचे प्रवक्ते होता. परवा अजित दादांनीही तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात फार काही चोंबडेगिरी करू नका, एवढाच आमचा सल्ला त्यांना आहे," असं पटोले म्हणाले.