सध्या कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून विरोध सुरू आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. बारसू रिफानरीवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महाडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी सुषमा अंधारे यांनी बारसूच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
“बारसूमध्ये ज्या जमिनी काही लाखांमध्ये विकत घेतल्या गेल्या, आता परत जे सोन्याचा भाव करून मागत आहेत, गुप्ता नावाचा अधिकारी ज्याची ९२ एकर जमिन बारसूत आहे, यावर किरीट सोमय्या केव्हा बोलणार आहेत? त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील. त्याच बारसूत आमदार आशिष देशमुखांची १८ एकर जमिन आहे त्यावर काही बोलणार क?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
“कोकणात मच्छिमारी करणाऱ्यांची नावं कदम, सावंत, जाधव अशी नावं समजतात परंतु झवेरी गुप्ता, शर्मा केव्हापासून तिकडे आले? बारसूत जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या त्यांची आडनावं अमराठी कशी? या अमराठी आडनावांनी भूमीपूत्र असणाऱ्या कोकणवासींना हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल तर कोकणवासींयांसोबत ठामपणे उभं राहण्याची जबाबदारी आपली असेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“उद्धव ठाकरेंनी प्रकल्पातील प्रत्येकाला आपण तुमच्या लढ्यात सोबत आहोत याचा विश्वास दिला. कारण आमचं हिंदुत्व दंगली करून घरं पेटवणारं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व डोळ्याला पाणी नम नम करणारं हिंदुत्व नाही, तर डोळ्याचं पाणी पुसणारं हिंदुत्व आहे,” असं अधारे यावेळी म्हणाल्या.