Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठका घेत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांकडून टीका होत असताना आता, उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडल्यानंतर पक्ष वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी असणारा बंजारा समाज दुरावू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीमध्ये येण्याची शक्यता आहे. पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंतांची भेट घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री संजय राठोड पोहरादेवीत आले होते.
आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान पोहरादेवीला ते भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे मुंबईतील काही पदाधिकारी पोहरादेवीला दाखल झाले आहेत. पोहरादेवीच्या दर्शननंतर उद्धव ठाकरे हे रामराव महाराज स्मृतीस्थळ, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवीच्या दर्शनाला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे आता बंजारा समाज शिवसेनेशी दूर जाऊ नये म्हणून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामिल झालेले आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी अनेक आरोप केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सत्तेत संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला होता.