मुंबई - आगामी निवडणुका लक्षात घेता अलीकडेच शिवसेना-ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केली होती. मात्र काही दिवसांतच युतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सूचक सल्ला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आबंडेकरांनी काय विधान केले माहिती नाही. परंतु अशाप्रकारे कुणीही विधाने करू नये. शरद पवार हे महाराष्ट्रातले नव्हे तर देशात भाजपाविरोधात जी आघाडी निर्माण होतेय त्याचे ते स्तंभ आहेत. सातत्याने ते आघाडीचे प्रयत्न करतायेत. भाजपाच्या नियंत्रणेतील संस्थांनी सर्वात जास्त हल्ले हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत हे विसरता येणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सध्या प्रकाश आंबेडकर आणि वंचितसोबत शिवसेनेशी युती झाली आहे. ही घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी केलीय. आमची अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर हे भविष्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे. जर असे होणार असेल आणि ही प्रक्रिया सुरू असेल तर या आघाडीचे प्रमुख स्तंभ आहेत. नेते आहेत. त्यांच्याविषयी एकमेकांविषयी आदर ठेऊन बोललं पाहिजे असा सल्ला राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?शरद पवार हे भाजपाचेच आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत कालही तेच होते. आजही तेच आहेत. हे सगळ्यांसाठी धक्कादायक विधान असले तरी ते माझ्यासाठी नाही. तुम्ही डोळेझाक करून चालला आहात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.