Shiv Sena Uddhav Thackeray: राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आमदारांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित छावा सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलं आहे. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडलं आहे. "स्वराज्यासाठी धर्म न सोडता, मेलो तरी बेहत्तर असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंना दुर्दैवाने यातना भोगाव्या लागल्या. त्या संभाजीराजेंवरील चित्रपट या गद्दारांना दाखवलाच पाहिजे. जे लोक ईडी, इनकम टॅक्स, सीबीआय यांच्या भीतीने पळून गेलेत त्यांनी संभाजीराजेंपासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, त्यामुळे यांना तो चित्रपट दाखवाच," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानपरिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.
नीलम गोऱ्हेंवर निशाणा
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा अविश्वास प्रस्ताव आम्ही याआधीच आणायला पाहिजे होता. पण आमच्याकडून उशीर झाला. या अधिवेशनातच सदर प्रस्तावावर चर्चा होणे आम्हाला अपेक्षित आहे. पक्षांतर हादेखील विषय आहे. अविश्वास प्रस्ताव कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आणला हे तुम्हाला लवकरच समजेल," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
"अबू आझमींचं कायमचं निलंबन करा"
क्रूरकर्मा औरंगजेबाची भलामण करणारं वक्तव्य करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वादात सापडले आहेत. अधिवेशनादरम्यान आज एकमताने आझमी यांचं विधानसभेतून निलंबन करण्यात आलं. "अबू आझमी यांचं किती दिवसांसाठी, किती तासांसाठी निलंबन करण्यात आलं, हे मला माहीत नाही. मात्र महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं कायमचं निलंबन करायला हवं," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.