शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:54 AM2020-01-15T08:54:12+5:302020-01-15T08:56:19+5:30

राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसप्रणित यूपीएचा भाग नाही

Shiv Sena with UPA on key national issues says mp sanjay raut | शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार

शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार

Next

पुणे: भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेली शिवसेना यापुढे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकांमध्ये दिसणार आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याआधी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली. शिवसेना आपली स्वतंत्र ओळख जपेल, अशी भूमिका त्यावेळी पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत (यूपीए) असेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीविरोधात रणनीती निश्चित करण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना अनुपस्थित होती. त्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विसंवादातून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना यापुढील बैठकांना हजर राहणार का, या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिलं. 'होय, आम्ही नक्कीच विरोधी पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू,' असं राऊत म्हणाले. 

'आम्ही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या बैठकीला हजर राहिलो असतो. मात्र काहीतरी विसंवाद झाला. या बैठकीला केवळ मुख्यमंत्र्यांनी हजर राहायचं आहे असं आम्हाला वाटलं. मात्र पक्षाचा कोणताही वरिष्ठ नेता या बैठकीला उपस्थित राहू शकतो, हे आम्हाला नंतर समजलं. थोडा संभ्रम निर्माण झाल्यानं आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहिलो नाही,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

शिवसेना यूपीएचा भाग होण्यास तयार आहे का, या प्रश्नावर राऊत यांनी सावध पवित्र घेतला. 'यूपीएमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मिळाल्यास पक्षातल्या नेत्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,' असं राऊत म्हणाले. आम्ही आता एनडीएत नाही. आम्ही सध्या तरी कोणत्याही गटाचा भाग नाही. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर, राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर यूपीएनं भूमिका घेतल्यास शिवसेना विरोधी पक्षांसोबत जायचं का याबद्दलचा निर्णय घेईल. महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही यूपीएसोबत असू, असं राऊत पुढे म्हणाले.
 

Web Title: Shiv Sena with UPA on key national issues says mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.