मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले आहे. या गोंधळास जबाबदार कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भारतीय जनता पक्षाला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे? महाविकास आघाडीने समन्वय आणि नियोजन या सूत्राने काम केले असते तर या वेळी तीन जागा कायम राखून एक जागा जास्त जिंकता आली असती, पण आता आहे ते सुद्धा गमावण्याची वेळ आली आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘तांबे’ मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या महिन्यात एका जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. या सगळय़ात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा. वास्तविक महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्देनाशिक पदवीधर, कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक आणि संभाजीनगर शिक्षक अशा पाच मतदारसंघांत या निवडणुका होत आहेत. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीकडे आणि दोन जागा भाजपकडे होत्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात तर सगळेच उलटे पालटे घडले.
काँग्रेस उमेदवार विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक मारलेली पलटी धक्कादायक आहे. डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. पण डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनही पक्षातर्फे अर्ज भरला नाही. मात्र त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.
मुलास आमदार करावे याच उदात्त हेतूने डॉ. तांबे यांनी ही खेळी केली व त्यामागे भारतीय जनता पक्षाचे पेच आहेत. भाजप आता सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याची भाषा करू लागला आहे. हे औदार्य काय अचानक उफाळून आलेले नाही.
सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे. म्हणजे थोरात हे त्यांचे मामा. पुन्हा सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांत त्यांची गणना होते. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी हे नगर येथे प्रचारासाठी आले असताना गांधी यांनी सत्यजीत तांबे यांच्याच निवासस्थानी मुक्काम केला होता. इतके जवळचे नाते.
राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही सत्यजीत तांबे सामील झाले. अशा माणसाने फक्त एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे हे न पटणारे आहे. सत्यजीत तांबे व डॉ. सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँगेसची अवस्था खराब झाली. आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही.
नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले असे सांगितले जाते. हाती सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे.
महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? काही नियोजन, बांधणी ठरली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.
अमरावतीमध्ये काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नसताना त्या जागेसाठी हट्ट करून लढणे हा प्रकार नक्की काय म्हणावा? शेवटी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लिंगाडे यांना काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारीची हळद लावावी लागली. मग ही जागा शिवसेनेस सोडली असती तर लिंगाडे हे तयारीनिशी लढले असते.
लिंगाडे यांनी लढण्याची तयारी केली होती व मतदार नोंदणीस जोर लावला होता. नागपुरातील शिक्षक मतदारसंघ काँग्रेसने शिवसेनेसाठी सोडला, पण तेथे आता काँगेस व राष्ट्रवादीनेही त्यांचे उमेदवार टाकल्याने बेकीचे चित्र उभे राहिले.
याच नागपूर पदवीधर मतदारसंघात दोन वर्षांपूर्वी काँगेसचे अभिजित वंजारी यांनी भाजप उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव केला होता. अशा मतदारसंघात भाजपचा पराभव करणे कठीण नाही. फक्त एकी हवी हेच वंजारी यांनी सिद्ध केले.
शिक्षक मतदारसंघात नागपुरात आता बहुरंगी लढत होईल. संभाजीनगर शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा निवडून येतील. येथे भाजपला उमेदवार मिळाला नाही, तेव्हा मूळ काँग्रेसच्या किरण पाटलांना उमेदवार बनवले.
कोकण शिक्षक मतदारसंघात ‘शेकाप’चे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या विरोधातही भाजपकडे उमेदवार नाही, मग आयात केलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना हळद लावून उभे केले. भाजपकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. इकडचे तिकडचे लोक गोळा करून रिकाम्या जागा भरणे सुरू असते. तरीही भाजप तगडे आव्हान देत असल्याची हवा निर्माण केली जात आहे ती महाविकास आघाडीतील ढिलाईमुळे.