Eknath Shinde Amit Shah Meeting Latest News: महायुती सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून, मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री होण्यास शिंदे झाले तयार
भाजप सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला. त्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला होता. त्यांची भूमिक शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत स्पष्ट नव्हती. शिवसेना आमदारांच्या मागणीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला.
शपथ घेतल्यानंतर शाहांसोबत बैठक
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, "एकनाथ शिंदे शपथ घेण्यास जाणार आहेत. शपथविधी झाल्यानंतर अमित शाहांना ते भेटणार आहेत. त्या बैठकीत गृह खाते आणि इतर खात्यांचा निर्णय होईल."
एकनाथ शिंदेंचा गृह खात्यासाठी आग्रह आहे. उपमुख्यमंत्री आणि गृह खाते असे शिंदेंना हवे असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर गृह खात्याचा आग्रह धरण्यास सुरूवात केली होती.
खातेवाटपाचा निर्णय होऊ न शकल्याने तीन जणांचाच शपथविधी होणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे.