राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांपैकी काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचाही दावा करण्यात आला होता.
दरम्यान, काही आमदार परतण्याच्या विचारात असल्याचंही सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे एबीपी माझाशी संवाद साधत होते. त्याच वेळी त्यांच्या मोबाईलवर शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांचा फोन वाजला. यावेळी त्यांनी खैरे यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंतीही केली. तुम्ही परत कधी येणार, मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जातो, असं खैरे बोरणारे यांना म्हणाले.
संवादादरम्यान, बोरणारे यांनी खैरे यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली. बोलताना खैरे यांनी त्या ठिकाणी काय सुरू आहे असा प्रश्नही केला. त्यावर उत्तर देताना बोरणारे यांनी चहा, नाश्ता, गप्पा सुरू असल्याचं उत्तर दिलं. मी मध्यस्थी करतो, मी तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे नेतो, किती जण येणार सांगा असा सवालही खैरे यांनी त्यांना केला. यावर बोरणारे यांनी सर्वांसाठी मध्यस्थी करा असंही सांगितलं. सर्वांसाठी नाही, आपल्या जिल्ह्यातील किती आमदार येता सांगा, मध्यस्थी करतो असंही खैरे त्यांना म्हणाले.