पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी डावलल्याच्या कारणावरून प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेनेत चांगलीच धुसफूस निर्माण झाली होती. प्रभा ग क्रमांक ४ मध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केले खरे, मात्र पक्षाने दिलेले एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत न पोहचल्याने शिवसेनेचे संपूर्ण पॅनल पुरस्कृत करावे लागले. विशेष म्हणजे या नाट्यमय घडामोडीनंतर कोणी पक्षालाच आव्हान देत पक्षाविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतला तर काहींनी थेट पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करून भाजपाच्या कार्यकारिणीतही वर्णी लावली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेनेकडून शिवसेनेने माजी नगरसेवक भगवान भोगे, सविता बडवे, प्रतिभा घोलप, रेखा पगारे या चौघांना पुरस्कृत घोषित केलेले होते मात्र बंडखोरी केलेल्या काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर काहींनी अन्य पक्षात प्रवेश केला. इतर मागास प्रवर्ग जागेसाठी भोगे, सतनात राजपूत व सविता बडवे या तिघांमध्ये रस्सीखेच सुरू होती, परंतु ऐनवेळी एबी फॉर्म वेळेत सादर न केल्याने त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना शिवसेनेने संधी दिल्याने अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. सेनेकडून उमेदवारी करणाऱ्या सतनाम राजपूत यांनी निवडणुकीतून माघार घेत लागलीच भाजपात प्रवेश केल्याने त्यांची भाजपाने शहर उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. राजपूत यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका उमेदवाराच्या हातातून एबी फॉर्मच्या नक्कल पळवून त्या फाडून टाकल्या होत्या. त्या गोंधळातच कोरे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात दिल्याने सेनेला मोठा राजकीय फटका प्रभागातून बसला होता. या वादातच पक्षाने शिवसेनेचे चार उमेदवार पुरस्कृत केले खरे, परंतु त्यांच्यातही फूट पडल्याने शिवसेनेच्या पुरस्कृतांना भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वार्ताहर)
शिवसेनेत चांगलीच धुसफूस
By admin | Published: February 08, 2017 9:54 PM