सिंधुदुर्ग - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. १५ दिवसानंतरही केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार हाकलताना दिसत आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केलीय. १६५ आमदारांचे बहुमत असताना अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सरकार घाबरतंय कशाला असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तर मंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गटात १०० टक्के बंडखोरी होईल असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत दिसेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहे. तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर १०० टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत असा दावा त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झालेत. त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला अशा शब्दात विनायक राऊत यांनी भाजपा आणि फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.
राज्यात सरकार कुठे आहे? - शिवसेनामुख्यमंत्र्यांची एक तऱ्हा तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरीच तऱ्हा असा एकंदरीत प्रकार राज्यात सुरू आहे. तरी सरकार कोठे आहे? मंत्रिमंडळ कोठे आहे? राज्यपाल महोदय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहेत. महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सगळा भार वाहत आहेत. एकंदरीत महाराष्ट्रात नवे सरकार आले की गेले तेच कळत नाही. सध्या प्रश्न इतकाच आहे की, राज्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मुळातच तो होणार की नाही? की विद्यमान सरकारचा ओंडका घटनेच्या पुरात वाहून जाणार आहे? अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे.
त्याचसोबत महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना भाजप पिलावळीस प्रश्न पडत असे – ‘राज्यात सरकार आहे काय? सरकारचे अस्तित्व दिसत नाही’ वगैरे वगैरे. आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला नेमका तोच प्रश्न पडला आहे. राज्यात सरकार आहे काय? असलेच तर ते सरकार कोठे आहे? शिवसेनेतील फुटीर गटाबरोबर भाजपने पाट लावून दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. पण वाजंत्री बहु गलबला होऊनही वऱहाडाच्या मुखी गोडधोडाचा घास काही जात नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण पंधरा दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. महाराष्ट्राची ही अशी निर्नायकी अवस्था झाली आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे.