Shiv Sena vs BJP, Aditya Thackeray Nitesh Rane: पुण्यात आदित्य ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा कात्रज चौकात आमनेसामने आला. यावेळी काहींनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना घडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. शिंदेंचा ताफा पुढे गेल्यानंतर उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली. त्यावेळी काही लोकांनी बेसबॉल बॅट, सळ्या, दगडं हातात घेत त्यांच्या कारवर हल्ला केल्याचे उदय सामंत यांनी हल्ल्यानंतर बोलताना सांगितले. या हल्ल्यात शिवसैनिकांचा संबंध नाही असे शिवसेनेच्या विनायक राऊतांनी सांगितले. पण असे असले तरी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याशी या हल्ल्याचा संबंध आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तशातच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या शिवसैनिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहेत. अशा परिस्थितीत आज आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही पुण्यातच होते. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा कात्रज चौकातून क्रॉस झाला. त्यानंतर उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला. या घडलेल्या प्रसंगानंतर नितेश राणेंनी एक ट्वीट केले. "निष्ठा यात्राच्या बरोबर.. "फटके" यात्रा काढण्याची वेळ आली आहे.. म्याँव म्याँव बंद होईल!! हीच ती वेळ!!!", असे ट्वीट करत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, "माझी कार सिग्नलला थांबली होती, त्यावेळी माझ्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांनी हल्ला केला. मग १२-१५ जणांनी शिवीगाळ व घोषणाबाजी केली. या लोकांनी कार वर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण असा भ्याड हल्ला केल्याने आम्ही घाबरणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये. या हल्ल्याने दाखवून दिलंय की राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या पातळीला चालले आहे", अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी हल्ल्यानंतर दिली. तसेच, त्यांनी जवळच्याच पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देखील दाखल केली. मात्र, या हल्ल्यामध्ये जर कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील तर त्यांच्यावर कारवाई करू नये असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.