मुंबई - विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर मुलीचा झालेला पराभव भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र भाजप सोडण्यावर त्यांनी काहीही स्पष्ट केलं नाही. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष खडसेंना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.
उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी कायमच शिवसेनेला फारशी हालचाल करू दिली नाही. तर खडसे आणि महाजन यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे महाजनांना शह देण्यासाठी शिवसेनेला खडसे हवे आहेत. जळगावमधून विधानसभेला शिवसेनेने चार उमेदवार उभे केले होते. चारही उमेदावांराचा विजय झाला. मात्र या उमेदवारांना पाडण्यासाठी महाजन यांनी बंडखोर उभे केले होते, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तेव्हापासून महाजन आणि शिवसेनेत वैर निर्माण झाले आहे.
अर्थात महाजन यांच्याशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेला खडसेंच्या प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते प्रयत्नही करत आहेत. मात्र खडसे यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील खडसे यांच्यासाठी पायघड्या टाकून ठेवल्या आहेत. समर्थकांना देखील खडसे यांनी राष्ट्रवादीत जावं असं वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच खडसे यांची दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.