ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - राज्यात स्थिर सरकारसाठी व भाजपाने रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जे प्रश्न काँग्रेसवाले सत्तेत असताना सोडवू शकले नाहीत दुर्दैवाने तेच प्रश्न घेऊन काँग्रेस नेते गोंधळ घालतात असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षांना काढला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी भाजपासोबत युती तुटल्याची खंत वाटते असे सांगितले. युती अनाकलनीय पद्धतीने तुटली, मला पुन्हा कोळसा उगाळायचा नाही, पण शिवसेना एकाकी लढली व एकट्याच्या जोरावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले असे त्यांनी नमूद केले.सत्तास्थापनेत भाजपाला शिवेसेनेचीच मदत घ्यावी लागली, त्यांनी रितसर पाठिंबा मागितल्याने आम्ही भाजपासोबत गेलो असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या भ्रष्टमंत्र्यांची चौकशी करावी, यामुळे जनतेसमोर सत्य समोर येईल व विरोधकांच्या आरोपांमधील हवाही निघून जाईल असे मतही त्यांनी मांडले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या ना-याने युतीतूल धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.