औरंगाबाद - शेतकरी आज संकटात सापडला आहे. सरकारची कर्जमाफी आजही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पहोचली नाही. बँक आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक सुरु केली आहे .तुम्ही शेतकर्याला नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालय बंद पाडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिला आहे . उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील लासूर येथे पीक विमा केंद्रांना त्यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
पीक विमा योजनेत जो घोळ झालाय तो आता हळूहळू समोर येत आहे. विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले, प्रत्यक्षात यातील अनेक शेतकऱ्यांना आजही कर्जमाफी मिळाली नाही. मागे मी बीडला असताना एक शेतकरी माझ्या मंचावर आला, त्याला कर्जमाफी प्रमाणपत्र दिले होते. पण त्याचं कर्जमाफ झालं नव्हतं. 'आम्हाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे.' पण ही मागणी करताना राज्याची आर्थिक परिस्थिती बघावी लागते. दीड लाखांपर्यंत कर्जमाफी झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांनी मला आता अर्ज दिलेत, ते अर्ज घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गरज पडल्यास शेतकऱ्यांनाही सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल असे उद्धव म्हणाले. आता नुसती तोंडाची वाफ दवडून नाही चालणार, आता आपल्याला प्रत्यक्ष मैदानात उतरलेचं पाहिजे. असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.