मुंबई - राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. परंतु, देशातील अर्थव्यवस्थेची बिघडली स्थिती आणि त्यामुळे बेरोजगारीची वाढती समस्या याकडे भाजप फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. तर विरोधकही यावर फारसे आक्रमक दिसत नाहीत. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आर्थिक मंदीकडे डोळसपणे पाहण्यास सुरुवात केली असून भाजपला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली नोटबंदी आणि अपुऱ्या तयारीने लागू करण्यात आलेली जीएसटी यामुळे देशावर आर्थिक मंदीचे सावट आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील विरोधकांच्या आरोपांवर सहमती दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उद्योग बंद पडत आहेत. एकट्या महाराष्ट्रात लाखाहून अधिक उद्योग बंद पडल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली होती. त्यामुळे बेरोजगारीची समस्या भीषण होणार असंच दिसत आहे.
देशात आलेली मंदी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे शिवसेनेने वेळीच मित्रपक्षाला इशारा दिला आहे. शिवसेनेने भाजपवर सामनातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच सुडाचं राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, भाजपकडून त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आली असून उलट मनमोहन सिंग यांच्यावरच टीका करण्यात आली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. दररोज कामगार कमी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. यावर उपयायोजना केल्या नाही, तर सत्ताधाऱ्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.