ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म शिवसेनेकडून नगरसेवक राहिलेले नाना आंबोले भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून गपचूपपणे एबी फॉर्मचे वाटप सुरु आहे. नाना आंबोलेंचा सध्याचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला आहे. नाना आंबोलेंचे अन्य मतदारसंघात पूर्नवसन होण्याची शक्यता मावळल्याने त्यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. शिवसेनेकडून त्यांना प्रभाग समिती अध्यक्षपदासह बेस्टचे चेअरमनपदही भूषवले आहे.
आणखी वाचा
मतदारसंघात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी पक्षाला महाग पडू शकते. परळ-लालबाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2009 मध्ये येथे मनसेने मुसंडी मारली आणि बाळा नांदगावकर आमदार झाले. त्यानंतर 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला. सध्या इथे शिवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत.