ठाणे : विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील डावखरेंचे डाव खोटे ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, शिवसेना ही निवडणूक लढवणार आणि जिंकणारही असल्याचे सूतोवाच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीतर्फे वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकीसाठी सेनेकडून कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. परंतु, आता शिंदे यांनी शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देतानाच ही निवडणूक जिंकणार असल्याचे सूतोवाच केले आहे. परंतु, अद्याप उमेदवार का जाहीर केला नाही, असा सवाल त्यांना केला असता, याचा निर्णय शिवसेनापक्षप्रमुख घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उमेदवार कोण असेल, याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. शिवसेनेत सध्या या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. गोपाळ लांडगे, अनंत तरे, रवींद्र फाटक आणि सुनील चौधरी यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यापैकी कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, याबाबत मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातील कोणालाही तिकीट दिले तरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळणारा कालावधी कमी असल्याने प्रचार कसा करणार, असा सवालही त्यांना केला असता, शिवसेनेला प्रचाराची गरज नसल्याचे ते म्हणाले. गुरुवारी मुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सोबतदेखील चर्चा झाली असून महायुतीचा उमेदवार येथे उभा राहणार असून तो निवडून येईल, अशी खात्री त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
शिवसेना निवडणूक लढणार आणि जिंकणार
By admin | Published: May 14, 2016 2:53 AM