महाड (रायगड) - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेनेची युतीसाठी मनधरणी होत आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. महाड येथे झालेल्या रायगड लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना शिवसेना भाजपच्या सत्तांध हत्तीवर अंकुश मारणारच असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे, असी गर्जना केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे. पण थापांचा दुष्काळ मात्र नाही. निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे, गाजरे गावागावात वाटली जातील. मात्र मला सत्तेचा मोह नाही. शिवसैनिकांचं प्रेम हीच माझ्यासाठी केवढी मोठी सत्ता आहे. आता भाजपाच्या सत्तांध हत्तीवर अंकुश मारणारच. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे." तसेच पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे करणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना यापुढे स्वबळावर लढणार आहे. याचे रणशिंग फुंकले आहे. मावळे समोर आहेत. आता लढाईची सुरुवात झालीय. देशाचं वातावरण आणि राजकारण बिघडत चालले आहे. राम मंदिरासाठी जमवलेल्या विटा या मंदिरासाठी नव्हत्या तर तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पायऱ्या होत्या, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज महाड येथे मेळावा झाला. यावेळी ठाकरे बोलत होते. 2019 निवडणूक येणार आहे. यात काय होणार याची नाही तर लोकांचं काय होणार, देशाचे काय होणार याची चिंता असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाच्या सत्तांध हत्तीवर शिवसेना अंकुश मारणारच, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्वबळाचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 3:51 PM