नागपूर - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा -शिवसेना युती होण्याची तीळमात्र शक्यता नसल्याचा दावा शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख खा.गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
काही महिन्यांअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा, असे सांगितले होते. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन्ही पक्षात युती होईल असा विश्वास व्यक्त केला होता. भाजपा व शिवसेना यांच्यात आता युती होणे शक्य नाही. आपण स्वबळावर आपली ताकद दाखवून देऊ. नागपुरातदेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उमेदवार उभा करु असे कीर्तीकर म्हणाले. नागपूर विभागातील चारही लोकसभा जागांवर मजबूतीने निवडणूकांसाठी तयारी करु. यात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.