खेड – सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्व आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडलेला आहे, शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. खेड तालुक्यातील भाजपा मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. दरेकरांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेळोवेळी धर्मनिरपेक्ष सरकार असल्याचं सांगत हिंदूंशी दुजाभाव केला, अयोध्येतील विवादीत ढाचा पाडण्यात पुढाकार घेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत शरद पवार जाऊ देतील का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. राम मंदिराच्या भूमीपूजनालाही विरोध करुन कोरोनाशी परिस्थिती पाहता ई-भूमीपूजन करण्यात यावं असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला होता. हिंदूत्वाशी तडजोड करत असल्याच्या कारणावरुन या शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे.
तसेच देशात ४ महिन्यांहून अधिक काळ होऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे. राज्यात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झाले, त्या पीडितांनाही नुकसाई भरपाई मिळाली नाही. दूध उत्पादकांचा प्रश्न तसाच आहे, शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासत आहे. मात्र या सर्व गोष्टींकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.