बाळापूर : शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोग लागू करावा, या मागण्या शिवसेनेने हाती घेतल्या आहेत. त्या पूर्ण होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले. ते बाळापूर येथे शिवसेनेच्यावतीने शेतकर्यांना कर्जमुक्ती या मागणीसाठी रूमणे मोर्चापूर्वी अकोला नाक्याजवळ मंडपात आयोजित सभेत बोलत होते. या सभेत मार्गदर्शन करताना संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत यांनी शिवसेना ८0 टक्के समाजकारण, तर २0 टक्केच राजकारण केले. कुठलीही निवडणूक नसताना शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळावी, ही मागणी घेऊन शेतकरी हितासाठी शिवसेना काम करेल. राज्य शासनाने शेतकर्यांना कर्जमुक्त न केल्यास शिवसेना मंत्र्यांना गावबंदी करण्यासाठी पुढाकार घेईल, असा इशारा दिला. या सभेला प्रमुख अतिथी आमदार गोपीकिसन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, जिल्हा उपप्रमुख रवींद्र पोहरे, माजी उपप्रमुख सेवकराम ताथोड, सुभाष धनोकार, उमेशआप्पा भुसारी, तालुकाप्रमुख संजय शेळके, शहरप्रमुख बनचरे आदी होते. सभास्थळी खा. सावंत, आ. गोपीकिसन बाजोरिया, नितीन देशमुख यांची भाषणे झाली. त्यानंतर भर उन्हात बैलगाडीवर खा. सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, महिला जिल्हाप्रमुख चोरे यांनी बसून मोर्चाचे नेतृत्व केले. शेतकरी कडक उन्हात बैलगाडीने रूमणे मोर्चात सहभागी झाले होते. अकोला नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने जाऊन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. कार्यालयाबाहेर सर्वांचे आभार जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी मानले. या मोर्चात मोठय़ा संख्येने शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी रूमणे मोर्चा जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात प्रथमच बाळापूर विधानसभा मतदारसंघात काढण्यात आला, हे विशेष.
शेतक-यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही- सावंत
By admin | Published: May 06, 2017 2:52 AM