ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी पुण्यामध्ये शिवसेनेवर हल्लाबोल केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे शिवसेनेने म्हटले होते.
त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्याशिवाय अविश्वास प्रस्ताव मांडणे शक्य नाही. त्यामुळे निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. पण त्यांना धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही असे राणे म्हणाले.
त्यांनी भाजपाच्या विजयाबद्दलही शंक व्यक्त केली. भाजपाने या निवडणुका प्रामाणिकपणे जिंकल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगरपालिकांपाठोपाठ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही भाजपाने आपले हात-पाय पसरले आहेत.