यदु जोशी / मुंबईभाजपाशी काडीमोड घेत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली जाणार नाही पण सरकारमध्ये राहून संघर्ष मात्र करीत राहा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर घेतली. पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. सरकारला असलेला शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील पण भाजपासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. आपल्या आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यांना जास्तीतजास्त निधी विकास कामांसाठी मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर मंत्र्यांवर दबाव आणा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे मंत्री शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करतील, असा निर्णयही झाला. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना जादा अधिकार मिळावेत, धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री व भाजपाच्या प्रमुख मंत्र्यांनी विश्वासात घ्यावे, हे मुद्देही मुख्यमंत्र्यांसमोर उद्या मांडले जातील, अशी माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये निधी, योजनांच्या वाटपाचे सूत्र ठरलेले होते. तसे या सरकारमध्ये काहीही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपाच्या मर्जीवर शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये निधी दिला जातो. या बाबत मातोश्रीवरील आजच्या बैठकीत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधिमंडळाच्या कामकाजात भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय दिसतो तेवढा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे बरेचदा आपलेच दोन मंत्री एकाच विषयावर वेगवेगळी भूमिका घेताना दिसतात. महत्त्वाच्या विषयावर आधीच एकत्रित चर्चा करून भूमिका ठरवा, असे उद्धव यांनी मंत्र्यांना बजावल्याची माहिती आहे. आमदारांची कामे करा - मंत्र्यांना सुनावलेमंत्रालयात येणारे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदारांची कामे प्राधान्याने करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. तसे होत नसल्याच्या खूप तक्रारी आहेत, अशी समज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मंत्र्यांना दिल्याचे समजते. शिवसैनिकांची कामे मंत्रालयात जलदगतीने व्हावीत यासाठी समन्वय यंत्रणा उभारण्यासही त्यांनी सांगितले.१० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडणुकीचा आढावादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. ज्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात शिवसेनेला सत्तेत आणले त्यांचे उद्धव यांनी अभिनंदन केले. शिवसेनेला महत्त्वाची काही खाती (जसे ऊर्जा, महसूल) मिळायला हवीत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट शब्दांत मागणी करायला हवी, असे मत एका कॅबिनेट मंत्र्याने या बैठकीत व्यक्त केले.
शिवसेना सरकारमध्येच राहणार
By admin | Published: March 31, 2017 4:58 AM