अमरावती - Abhijeet Adsul on Navneet rana ( Marathi News ) भारतीय जनता पार्टीकडून यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं महायुतीतील घटक पक्ष नाराज झालेत. त्यात प्रहारचे बच्चू कडू आणि शिवसेनेच्या अडसूळ पिता पुत्रांनी उघडपणे भाजपाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर अभिजीत अडसूळ भाजपाविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीत उभे राहण्याची तयारी करत आहेत.
याबाबत अभिजीत अडसूळ म्हणाले की, नवनीत राणांबाबत याआधीही आमची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांचा जातीचा दाखला खोटा आहे. भाजपाचे सर्वच नेते त्यांचाही विरोध आहे. बच्चू कडू, राष्ट्रवादी आणि आमचाही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे. नवनीत राणा यांना चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप झाले आहे. सर्वपक्षीय नेते आम्ही एकत्रित आहोत. यापुढे चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्याशी चर्चा झाली तेव्हा आम्हाला सांगूनच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं. परंतु एकतर्फी निर्णय घेण्यात आला. या उमेदवारीवरून प्रचंड खदखद आहे. ज्यांनी नवनीत राणांकडून मनस्ताप सहन केला आहे. कार्यकर्त्यांची घरे, कार्यालये फोडली आहेत. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्तेही मनापासून राणांचे काम करणार नाही. उमेदवारी घेतली परंतु निवडणूक सोप्पी नाही. वेळ आली तर अपक्ष निवडणुकीत उभे राहू असंही अभिजीत अडसूळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयात गेलो आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे. १४ दिवसांत निर्णय देणार होते. परंतु आज महिना होत आला तरी निर्णय झाला नाही. या देशातील जनतेने कधीही कोर्टाची पायरी चढू नये अशी खंत अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केली. २०१९ ची निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष लढवली होती. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला मात्र त्यानंतर राणा दाम्पत्याची जवळीक भाजपाशी वाढली.