मुंबई - एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या बंडामुळे उद्धव ठाकरेना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांच्यासमोर शिवसेनेचे अस्तिव टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश माजी नगरसेवक शिंदेगटात दाखल झाल्यानंतर आता अजून एका महानगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबई लगतच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेनेचे १८ नगरसेवक हे शिंदेगटात दाखल होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे नगरसेवक आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज १४ जुलै रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत.
मीरा भाईंदर शहरात गेल्या १३ वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान १८ शिवसेना नगरसेवक , तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत व शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे.