लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी तसे आवाहन केले आहे.
एखाद्या आमदाराचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या घरचे कोणी लढत असतील तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन परब यांनी पत्रकारांशी बोलताना केले. न्यायालयाच्या निकालानंतर ते म्हणाले की, ऋतुजा लटके यांचा राजीनामा नाकारण्यावरून खालच्या पातळीवर राजकारण झाले. ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी ११ वाजता मंजूर होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज भरू, असे ते म्हणाले.
निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजप वा मुख्यमंत्री शिंदे गट यांच्याशी चर्चा करणार का, असे विचारले असता परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की आज मी जाहीर आवाहन केले आहे, समोरून काय प्रतिसाद मिळतो ते आधी बघू, गरज पडली तर चर्चाही करू.
राजीनाम्याशी संबंध नाही; शिंदे गटाचे स्पष्टीकरणऋतुजा लटके यांच्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेळेत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज लटके यांनी दिला असता तर पुढच्या अडचणी आल्या नसत्या. लटकेचा राजीनामा हा महापालिकेच्या अखत्यारितील प्रश्न होता, आमचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही पण ठाकरे गटाकडून उगाच सहानुभूती घेतली जात आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
भाजपची ठाकरेंवर टीकाकम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्वमध्ये पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी नेत्यांनी आखला असून कम्युनिस्टांनी दिलेल्या पाठिंबा त्या कटाचाच एक भाग आहे.