मुंबई : भूसंपादन विधेयकावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. प्रस्तावित भूसंपादन विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागतील, असे सांगत सरकार उद्योगपतींकडील जमिनी परत घेणार का, असा सवालही खा. सावंत यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात, केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे; तर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणतात, प्रस्ताव आलाच नाही. तेव्हा नेमके खरे काय, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातूनही विचारण्यात आला आहे. शिवसेनेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना अजूनही सत्ताधारी पक्षाच्या मानसिकतेत नाही, असा टोला कृषिमंत्री खडसे यांनी लगावला. ते म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांनी लेखी उत्तरात मदतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगितले. हा प्रश्न ४० दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गेला तेव्हा वादळ, गारपीट झालेली नव्हती. परंतु गारपीट झाल्यावर आपण स्वत: तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेटून मदतीचा प्रस्ताव दिला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून मागणी केली होती. त्यामुळे लेखी उत्तर व वास्तव यामध्ये तफावत आली. शिवसेनेने माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांना हे सांगितले असते. आता तरी शिवसेनेने माझा खुलासा छापला तर मला आनंद होईल, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेची केंद्रावर, तर एकनाथ खडसेंची सेनेवर टीका!
By admin | Published: May 13, 2015 1:54 AM