ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 21 - येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक कामगिरी करता आलेली नसून, पक्षातील अंतर्गत वादाचा फटका या पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे़
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ६५ पैकी ६२ जागांवर उमेदवार उभे केले होते़ उमेदवारी देण्यावरून या पक्षातही बरेच वाद निर्माण झाले होते़ शिवाय खा़ बंडू जाधव व आ़ डॉ़ राहुल पाटील या दोन नेत्यांच्या गटांमध्ये देखील उमेदवारीवरून वादाचे प्रकार झाले होते़ पक्षाचे संपर्कप्रमुख आ़ सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन या दोन नेत्यांमधील वाद मिटला असल्याचे सांगितले असले तरी निवडणूक निकालामध्ये तसे दिसून आलेले नाही़ परिणामी पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली होती़ आ़पाटील यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून प्रचार यंत्रणा राबविली होती़ शिवाय शहराच्या विकासाचा अजेंडा तयार केल्याचे त्यांनी भाषणांमधून सांगितले होते़ तसेच पोस्टरबाजीच्या माध्यमातूनही त्यांनी मतदारांना आवाहन केले होते़ परंतु, परभणीतील मतदारांनी त्यांना साथ दिली नसल्याचे निकालांती स्पष्ट झाले आहे़ शिवसेनेची वोट बँक असलेल्या अनेक प्रभागांत पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत़ मनपातील विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, नगरसेवक नवनीत पाचपोर, सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नावंदर आदी दिग्गजांचा पराभव झाला असून, हा पराभव आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या गटासाठी धक्कादायक मानला जात आहे़ याशिवाय मतदानापूर्वी पूर्णा शहरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचाही शिवसेनेच्या मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा शहरातून होताना दिसून येत आहे़
सांघिक झाला नाही प्रचार
शिवसेनेकडून शहरात प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली गेली असली तरी नेत्यांमध्ये मात्र सांघिक प्रचार झाला नाही़ परिणामी पक्षाला फारसे यश मिळाले नाही़ उलट पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याने मतदारांनाच असुरक्षित वाटू लागल्याचे निकालातून दिसून आले आहे़ यावर आता पक्षातील नेत्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे़