पुणे/सातारा : जिथे राष्ट्रीय पक्षांना चाळीशीचा आकडा पार करता आला नाही, तिथं आमच्या प्रादेशिक पक्षाने ६३ आमदार निवडून आणले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता तर तुमच्या बरोबरच नाही तर तुमच्याही पुढे गेलो असतो. युती होणार की नाही, यात वेळ वाया गेला. पण हरकत नाही. पुढच्या वेळी विधासभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे सांगून इथूनपुढे ‘एकला चलो रे’ अशीच शिवसेनेची भूमिका असेल, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे पुणे शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे, शशीकांत सुतार, संपर्क प्रमुख डॉ़ अमोल कोल्हे, शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर व्यासपीठावर उपस्थित होते़ ठाकरे म्हणाले, की संसदेत पठाणकोट हल्ल्यावर चर्चा अपेक्षित होती़ ‘‘छाती किती आहे, हे महत्त्वाचे नाही तर ती निधडी हवी़ पठाणकोट हल्ल्यातील शहिदांचे रक्त सुकायच्या आत सरकारला क्रिकेट महत्त्वाचे वाटत आहे़ हिमाचल प्रदेश असमर्थता दाखवत असताना क्रिकेट कंट्रोल बोर्ड आम्ही सुरक्षा पुरवू, असे सांगत आहे़ हा देश केंद्र सरकार चालवतेय की क्रिकेट कंट्रोल बोर्ड?’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली़ धर्माचा द्वेष करायला मला शिकविले नाही़ देश हाच माझा धर्म आहे़ कोणी त्याच्या धर्माचा अभिमान घेऊन उभा राहणार असेल तर हिंदुत्व हा गुन्हा नाही़ मुस्लिम मताचे राजकारण होणार असेल तर मी हिंदुंचे राजकारण का करु नये, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला. स्मार्ट सिटीवर टीका करताना ते म्हणाले, की मुंबई, पुणे हे स्वत:हून स्मार्ट असताना पुन्हा त्यांना पावडर वगैरे लावायची गरज नाही़ पुण्याचे पुणेपण टिकवायचे आहे़ (प्रतिनिधी)
शिवसेनेचे एकला चलो रे...
By admin | Published: March 10, 2016 4:01 AM