लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ठाकरे गटाचे वकील टी.व्ही. सिंग व सनी जैन यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याची पुष्टी करणाऱ्या ८०० कागदपत्रांची फाइल सादर केली होती. निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, १९६८ या कायद्यानुसार धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर ठाकरे गटाला शनिवारी उत्तर द्यावयाचे होते, तसे ते त्यांनी कागदपत्रांसह सादर केले होते.
आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?
चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.
नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.
पोटनिवडणुकीत काय होणार?
- अंधेरी पूर्व येथे ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह दोन्ही गटांना मिळणार नाही.
- या निवडणुकीत ‘शिवसेना’ नाव वापरायचे असेल तर त्यांना शिवसेना-शिंदे गट किंवा शिवसेना-ठाकरे गट अथवा तत्सम पर्याय आयोगाकडे द्यावे लागतील. त्यावर आयोग निर्णय घेईल.
- धनुष्यबाण चिन्ह नसल्यामुळे निवडणुकीत उमेदवाराला चांगलाच जोर लावावा लागेल.