- मनोज मुळ्येलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली, तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या सर्वातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र, आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी तणावात गेला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र होते. शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे हे चित्र होते.या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले. हा भाजपसाठी मोठा बदल आहे.
आजवर भाजपचा आवाज दबलेलाच शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.