लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मध्यावधी निवडणुकीचे फक्त नाटकच सुरू आहे. बहुमत असतानाही त्यांना असे बोलावे लागत असेल तर सरकार दुर्बळ आहे, असाच त्याचा अर्थ आहे. शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री सांगतात तेवढी, म्हणजे ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी झाल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.यांच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीत मुंबईतील शेतकरी निघतात हे आश्चर्यजनक आहे. कुठे हवेत शेती करतात की काय त्यांनाच माहिती असेल. सरकारने आतापर्यंत जेवढे काही सांगितले आहे तेवढे फसवेच निघाले आहे. शेतकऱ्यांना त्यांना कर्जमाफी द्यायचीच नव्हती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी संघर्षयात्रा काढली. त्यानंतर आत्मक्लेश यात्रा निघाली, आसूड यात्रा काढण्यात आली. मग संपच झाला. त्यामुळे त्यांना कर्जमाफी करावीच लागली. मात्र ती फसवी निघू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणार आहे, असे पवार म्हणाले. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी झाले होते. ते वाढवण्यासाठी म्हणून प्रदेशाध्यक्षांनी राज्यस्तरीय संपर्क मोहीम सुरू केली. काही रचना नव्याने करण्यात येत आहे. पक्षाचे एकूण २४ सेल म्हणजे आघाड्या आहेत. त्या सक्रिय करण्यात येत आहेत. विद्यार्थी, युवक, युवती, यासाठी सेलसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. संपर्क मोहिमेमुळे राज्यभर फिरता येत आहे. त्या वेळी सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचे जाणवते आहे, असे पवार यांनी सांगितले. आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड येथे काम केले. कोणाला वाटले नव्हते त्यांना सत्ता मिळेल, पण मिळाली. त्यांच्याकडे गेलेले अनेक जण आमचेच आहेत. ते गेले म्हणून राष्ट्रवादी थांबलेली नाही. आमचे काम सुरूच आहे. राज्यातील सत्तेत बहुमत असूनही सरकार दुर्बल आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सातत्याने मध्यावधी निवडणुकीची भाषा केली जाते. मात्र त्यांचे आमदारच त्यांना तसे करू देणार नाही असे पवार म्हणाले.गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही भाजपाला पुण्यातील कचरा, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, मेट्रो, भामा-आसखेड पाणी योजना यांपैकी एकही समस्या सोडवता आलेली नाही. कर्ज काढून दिवाळी साजरी केली जात आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही, अशी टीका पवार यांनी पुण्यातील भाजपाच्या सत्तेवर बोलताना केली.
शिवसेनेच्या वाघाची झाली शेळी
By admin | Published: July 06, 2017 3:47 AM