मुंबई : शिवसेनेबरोबर चर्चा सुरू असून सुखद निर्णय येईल, या महाराष्ट्र भाजपाचे नवनियुक्त प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या विधानाने शिवसेनेच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी होणा:या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचा सरकारमध्ये समावेश होण्याची शक्यता धूसर आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई व मिलिंद नाव्रेकर हे मंगळवारी रात्री ओम माथूर यांच्या भेटीस गेले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. मात्र भाजपाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. दिल्लीत यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रथमच शिवसेनेला चर्चेकरिता निमंत्रण मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र माथूर यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने आपली भेटीकरिता परवानगी मागितलेली नाही,
असे माथूर यांच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)